नांदुरा : सासरकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ, पतीचे कथित विवाहबाह्य संबंध आणि पाच लाखांच्या हुंड्याची मागणी या त्रासाला कंटाळून २९ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील निमगाव येथे १४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि दिर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिलेचे नाव भारती विशाल पाऊलझगडे (वय २९) असे असून, तिचे वडील रामदास भगवान डवले (वय ६०, रा. चांगलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला) यांनी नांदुरा पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, भारती हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी विशाल पाऊलझगडे याच्यासोबत झाला होता. फिर्यादीनुसार, पती विशाल याचे एका महिलेसोबत कथित विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून तो दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करीत व मानसिक छळ देत असे. तसेच सासरे रामदास प्रल्हाद पाऊलझगडे, सासू रत्नप्रभा रामदास पाऊलझगडे आणि दिर वैभव रामदास पाऊलझगडे हे माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत भारतीला टोचून बोलत व छळ करत असल्याचा आरोप आहे. या सततच्या छळामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या भारतीने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८०(२), ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. घटनेच्या दिवशीच पती, सासू, सासरे व दिर या चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. १५ फेब्रुवारी रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पती विशाल पाऊलझगडे यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर सासू, सासरे व दिर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या कथित हुंडाबळी प्रकरणाचा तपास नांदुरा पोलीस करीत आहे.