बुलढाणा : – शेगाव शहर व परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, कार व मोबाईल असा एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शेगावसह अकोला जिल्ह्यातील दोन घरफोडींचीही उकल झाली आहे. शेगाव येथील माऊलीनगर परिसरात राहणाऱ्या धीरजकुमार रामपाल सिंग (वय ३५) यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व हुंडई कार (एमएच-४९-सीएच-४९५६) चोरीला नेली होती. या प्रकरणी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा परिसरातून राजेंद्र बाबासाहेब राऊत (रा. परतूर), राजेश शंकर शर्मा (रा. मनमाड, जि. नाशिक) आणि श्रीराम सोमनाथ सोनवणे (रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींवर यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी व वाहन चोरीचे अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौकशीत आरोपींनी सुरुवातीला टाळाटाळ केली; मात्र कसून चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १६ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ६५ हजार रुपये), हुंडई कार (किंमत ६ लाख रुपये) व तीन मोबाईल फोन (किंमत २१ हजार रुपये) असा एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील डाबकी रोड व खदान पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एका घरफोडीचीही कबुली आरोपींनी दिली असून, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व त्यांच्या पथकाने केली.