Headlines

‘माझी मराठी शाळा, माझा अभिमान’ पथनाट्याद्वारे शैक्षणिक जनजागृती; भालेगाव रण येथे विद्यार्थ्यांचे प्रभावी सादरीकरण; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मलकापूर :- जिल्हा परिषद मराठी शाळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि शाळेची पटसंख्या वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भालेगाव रण (केंद्र धरणगाव, पंचायत समिती मलकापूर) येथील विद्यार्थ्यांनी गावात सुरू असलेल्या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने ‘माझी मराठी शाळा, माझा अभिमान’ या पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण करून शैक्षणिक जनजागृती केली.
शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच गटशिक्षणाधिकारी फाळके, शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे आणि केंद्रप्रमुख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पथनाट्याच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद मराठी शाळांचे महत्त्व, शाळेत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली शाळेची भूमिका याबाबत ग्रामस्थांना रंजक पद्धतीने माहिती देण्यात आली.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या पथनाट्यातून गावातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावातीलच शाळेत शिक्षण घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पालकांना आणि मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाला ग्रामस्थ आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शिक्षिका अनिता खोटाळे

अनेक पालकांनी येत्या शैक्षणिक वर्षात आपल्या मुलांचा प्रवेश जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भालेगाव रण येथे घेण्याचा मानस व्यक्त केला असून इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी पात्र असलेल्या काही विद्यार्थ्यांचे तत्काळ नावनोंदणीही करण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि कार्यक्रमाच्या आयोजकांनी मुख्याध्यापक सौ. माया राणे, शिक्षक सौ. प्रतिभा चौधरी, कु. सरोज क्षीरसागर, सौ. अनिता खोटाळे तसेच पथनाट्यात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शाळेच्या विकासासाठी गावाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही ग्रामस्थांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!