Headlines

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार, आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी

लोणार : तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिच्यावर जबरदस्तीने मातृत्व लादल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणार पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये ९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपूर्वी आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलीने एका बाळास जन्म दिला. रुग्णालयात प्रसूती झाल्यामुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात लोणार पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून आरोपी युवकाविरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचारासह, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये लोणार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात गोपाल राठोड, जमादार पंडित नागरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *