खामगाव: किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन चाकूहल्ल्याची गंभीर घटना शेलोडी (ता. खामगाव) येथे सोमवारी रात्री ९:३० वाजता घडली. या हल्ल्यात एका वृद्धासह त्याच्या मुलालाही गंभीर जखमी करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर विश्वनाथ गाडे (३७) यांच्या काका रघुनाथ हरिश्चंद्र गाडे यांचा पवन दशरथ बानाईत याच्यासोबत पूर्वी किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर पवन बानाईतने धमकी दिली होती.
सोमवारी रात्री दशरथ बानाईत, मनोरमा बानाईत आणि मोहन बानाईत यांनी रघुनाथ गाडे व त्यांचा मुलगा गोपाल गाडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या प्रकरणी पवन दशरथ बानाईत, मनोरमा दशरथ बानाईत, दशरथ आत्माराम बानाईत आणि मोहन दशरथ बानाईत (सर्व रा. शेलोडी, ता. खामगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून पुढील तपास पोलीस करत आहेत.