खामगाव :- शहरातील शेगाव रोड परिसरातील ‘फूड स्टोरी’ कॅफेमध्ये शालेय वयातील मुला-मुलींना एकांतासाठी स्वतंत्र कॅबिन उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान कॅफेमध्ये तीन जोडपी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. शहरातील शेगाव रोड परिसरात असलेल्या ‘फूड स्टोरी’ कॅफेवर पोलिसांनी छापा टाकत संशयास्पद हालचालींवर कारवाई केली. पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कॅफेमध्ये शालेय वयातील मुला-मुलींना एकांतात बसण्यासाठी स्वतंत्र कॅबिन्स उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कॅबिन्ससाठी प्रति तास सुमारे २०० रुपये आकारले जात असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी अचानक धाड टाकली असता कॅफेमध्ये तीन जोडपी आढळून आली. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन मिशन परिवर्तन’ अंतर्गत यापूर्वी नोटीस देण्यात आलेल्या काही व्यक्तींवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. शेगाव रोड परिसरात असभ्य वर्तन करताना आढळून आलेल्या चंद्रकांत संजय बंड (रा. पातूर), हर्ष संजय गवई आणि संतोष नामदेव रहाणे (रा. घाटपुरी) यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ११० व ११७ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तसेच गौरव अशोक गावत्रे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.