मलकापूर : तालुक्यातील वडोदा परिसरातून एक २० वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळी घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडलेली ही तरुणी अद्याप परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत असून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. याबाबत कमलेश कोल गणपत कोल (रा. अडगाळ, ता. रामपूर, जि. सिधी, मध्य प्रदेश; ह.मु. वडोदा रेल्वे स्टेशन, ता. मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी आसमी (वय २० वर्ष) ही वडोदा येथे आपल्या मावशीकडे वास्तव्यास होती. दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास ती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. दिवसभर शोधाशोध करूनही तिचा ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर पोलिसांत धाव घ्यावी लागली. या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे कायम मिसिंग क्र. ०२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणीचा शोध घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे व नातेवाईकांकडे चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरुणीचे वर्णन उंची अंदाजे ५ फूट, रंग गोरा, कपाळ उंच, चेहरा गोल, बांधा मध्यम आहे. अंगात गुलाबी रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट होती. गळ्यात तावीज बांधलेला काळा धागा आहे. उजव्या हातावर हार्ट शेपचा टॅटू आहे. तिच्यासोबत अँड्रॉईड मोबाईल असल्याची माहिती आहे. सदर तरुणी कोणाला आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास त्वरित मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.