जळगांव :- धरणगाव-एरंडोल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी सैनिक असलेल्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर उघड झालेल्या सुसाईड नोटमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या नोटमध्ये त्यांनी स्वतःच मुलाचा खून केल्याची कबुली दिली असून, त्याचा मृतदेह धरण परिसरात पुरला असल्याची माहिती दिली आहे.
सुसाईड नोटमुळे उलगडला खुनाचा तपास
विठ्ठल सखाराम पाटील (माजी सैनिक) यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या खोलीत सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मुलाचा खून केल्याचे लिहिले होते. मृत तरुण विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय 22, रा. भोरखेडा) हा सोशल मीडियावर प्रसिद्ध रील स्टार होता. या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.
पोलिसांनी गुरुवारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात शोध घेतला असता, तिथे मातीमध्ये पुरलेला मृतदेह आढळून आला. जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
हत्या आणि आत्महत्येमागील कारण गुलदस्त्यात
माजी सैनिक असलेल्या वडिलांनी मुलाचा खून का केला आणि त्यानंतर आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर, धरणगाव पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांनी पाहणी केली. एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही दुहेरी शोकांतिका नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस वेगाने तपास करत आहेत.