मलकापूर ( दिपक इटणारे ): ज्या शेतकऱ्यांच्या कष्टावर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालतो, त्याच शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडून राहतो आणि व्यापाऱ्यांचा माल टिनशेडमध्ये सुरक्षित ठेवला जातो, असा धक्कादायक प्रकार मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलाड यार्डमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे बाजार समिती शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून, याकडे कृउबास प्रशासन व सचिव जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलाड यार्डमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल उघड्यावर ठेवण्यात येत असून, त्याला कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही. पावसाळा असो वा कडक ऊन, शेतकऱ्यांचा माल वार्यावर सोडला जात असल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या मालासाठी उभारण्यात आलेल्या टिनशेडमध्ये मात्र व्यापाऱ्यांनी विकत घेतलेला शेतीमालाचे पोते रचून ठेवण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी कृउबास सभापती यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी घाम गाळून शेतीमाल पिकवतात; मात्र विक्रीसाठी बाजारात आल्यानंतर त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. याउलट व्यापाऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, हे सर्व बाजार समितीचे सचिव यांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बेलाड यार्डमधील टिनशेडचा वापर शेतकऱ्यांसाठी होणे अपेक्षित असताना, तो व्यापाऱ्यांच्या मालासाठी वापरला जात असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात संबंधित सचिवांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच टिनशेडमधील व्यापाऱ्यांचा माल तत्काळ हटवून शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी टिनशेड उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी अजय टप यांनी केली आहे. जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही, तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.