मलकापूर : शहरातील शिवाजीनगर परिसरातील २२ वर्षीय युवक घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून युवकाचा शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांता महादेव जाधव रा. शिवाजीनगर, मलकापूर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा राहुल महादेव जाधव (वय २२ वर्ष) हा १ मार्च रोजी सकाळी घरातून कामावर जात असल्याचे सांगून बाहेर पडला. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. दरम्यान, राहुल जाधव याने आपली मोटारसायकल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उभी करून तेथून निघून गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांसह पोलिसांनीही युवकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. बेपत्ता युवकाची उंची सुमारे ५ फूट २ इंच असून रंग सावळा आहे. तो घरातून निघताना अंगात काळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आणि पायात पांढऱ्या रंगाचे बूट असा पोशाख होता. सदर युवक आढळून आल्यास नागरिकांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शरद मुंडे करीत आहेत.