मलकापूर बसस्थानकात लागलेली आग अग्निशमन दलाच्या तत्परतेने आटोक्यात; मोठा अनर्थ टळला!

मलकापूर : – येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी (दि. 10 ) रात्री सुमारे 9.10 वाजताच्या सुमारास कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार दीपक ईटणारे व उमेश ईटणारे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी वासुदेव भोपळे व रामभाऊ येनकर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाच्या जवळच विद्युत वितरण कंपनीचे मोठे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अग्निशमन दलाच्या वेगवान कारवाईमुळे आग पुढे पसरण्यापासून रोखण्यात यश आले. या घटनेची माहिती पत्रकार उमेश ईटणारे यांनी बसस्थानक व्यवस्थापक मुकुंद न्हावकार तसेच पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना दिली होती. त्यानंतर बसस्थानक व्यवस्थापक मुकुंद न्हावकार यांनी तातडीने घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली. आगीची घटना समजल्यानंतर नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र वाहतूक पोलीस कैलास सोनोने व रोकडे यांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत करत मार्ग मोकळा केला. अग्निशमन दल, पोलीस व स्थानिकांच्या सतर्कतेमुळे ही आग वेळेत आटोक्यात आली आणि मोठी हानी टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!