Headlines

शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना २४ तास सिंगल फेज वीज द्या – संभाजी शिर्के यांची मागणी

मलकापूर : दाताळा एमएसईबी अंतर्गत येणाऱ्या वरखेड, सावडी, भाडगणी व लासुरा शिवारातील शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना २४ तास सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज मलकापूर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता तायडे यांना निवेदन सादर केले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा सिंगल फेज वीजपुरवठा बंद ठेवला जात आहे. त्यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून अंधारामुळे जनावरे तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सध्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी सुरू असल्याने संध्याकाळच्या अभ्यासाच्या वेळी वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरही परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. “गावात किंवा शहरात राहणारा माणूस जसा माणूस आहे, तसाच शेतात राहणारा शेतकरीही माणूसच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून शेतात राहणाऱ्या कुटुंबांना २४ तास सिंगल फेज वीजपुरवठा द्यावा,” अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, या मागणीवर महावितरणने तात्काळ निर्णय घेतला नाही तर संबंधित शिवारातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संभाजी शिर्के यांनी दिला.
यावेळी निवेदन देताना परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!