बुलढाणा : लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच हुंड्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. फातिमा शेख दानिश (वय २१, रा. इकबाल नगर, बुलढाणा) यांचा विवाह १२ मे २०२५ रोजी शेख दानिश शेख नइम (वय २४) यांच्याशी बुलढाणा येथे झाला होता. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सासरकडून चांगली वागणूक मिळत होती. मात्र काही दिवसांनंतर पती, सासरे शेख नइम शेख करीम (वय ५५) व सासू सौ. कमरोनीसा शेख नइम (वय ४५) यांनी हुंड्यात दिलेल्या वस्तूंवरून नाराजी व्यक्त करत टोमणे मारण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच पतीचा व्यवसाय नीट चालत नसल्याचे कारण देत माहेरहून १ लाख रुपये आणण्याचा सातत्याने तगादा लावण्यात येत होता. पैशांची मागणी पूर्ण न झाल्याने फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण तसेच मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २० सप्टेंबर २०२५ रोजी पैशांच्या कारणावरून झालेल्या वादात मारहाण करण्यात आल्याने फिर्यादी माहेरी परत आली असून तेव्हापासून ती इकबाल नगर येथे वास्तव्यास आहे. दरम्यान, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी महिला व मुलांसाठी सहाय्य कक्ष, बुलढाणा येथे तक्रार अर्ज देण्यात आला होता. मात्र तेथे कोणताही समझोता झाला नाही. उलट, पैसे दिल्याशिवाय सासरी नांदवून घेणार नसल्याची भूमिका आरोपींकडून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कायम अप.क्र. १३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील करीत आहेत.