नांदुरा:- वडनेर भोलजी येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी ६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगपूर (ता. नांदुरा) येथील १६ वर्षीय मुलगा दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता वडनेर भोलजी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बसलेला होता. त्यावेळी वडनेर भोलजी येथील सुनील सातव (वय ६० वर्षे) याने मुलाशी संपर्क साधून अयोग्य वर्तन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, आरोपीने मुलाशी लज्जास्पद प्रकारे वागण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलाने तात्काळ हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच वडनेर भोलजी पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार अजय सुरडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पीडिताच्या तक्रारीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत. समाजात वाढत्या अशा घटनांमुळे पालकांनी मुलांवर अधिक लक्ष ठेवावे, तसेच संशयास्पद प्रकार तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.