मलकापूर :राजकारणात आजही आर्थिक बळ आणि सत्तेची समीकरणे प्रभावी मानली जात असताना, त्या प्रवाहाला छेद देत सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला, कोणताही राजकीय वारसा नसलेला एक युवा चेहरा थेट निवडणूक रिंगणात उतरतो आहे. मलकापूर ग्रामीण पंचायत समिती सदस्य पदासाठी युवा सामाजिक कार्यकर्ता सागर मनोज जैस्वाल हे आगामी निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याची चर्चा सध्या ग्रामीण भागात जोर धरत आहे. सागर जैस्वाल यांची ओळख केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर नेहमीच लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, अडचणीच्या काळात धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता अशी आहे. कोणतेही पद, सत्ता किंवा राजकीय पाठबळ नसताना त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. रस्त्यांची दुरवस्था, नाले, पाणीपुरवठा, दळणवळण, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांसाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत अनेक कामे प्रत्यक्ष मार्गी लावली आहेत. विशेष म्हणजे, सागर जैस्वाल हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असून त्यांचा कोणताही राजकीय वारसा नाही. मात्र त्यांनी जनतेशी प्रामाणिक नाते जपून, कामातून विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळेच आज ग्रामीण भागातील युवक, शेतकरी, मजूर तसेच सामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. पंचायत समिती ही ग्रामीण विकासाची कणा मानली जाते. त्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करता यावे, जनतेच्या प्रश्नांना थेट न्याय देता यावा, यासाठीच आपण निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सागर जैस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. “सत्ता मिळवणे हे ध्येय नाही, तर जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणे आणि विकासाची कामे गतीने मार्गी लावणे हेच माझे उद्दिष्ट आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पंचायत समिती निवडणुकीची अधिकृत घोषणा काही दिवसांत होण्याची शक्यता असून, त्याआधीच सागर जैस्वाल यांच्या प्रवेशामुळे मलकापूर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पारंपरिक राजकारणाला आव्हान देणारी ही उमेदवारी असल्याने, निवडणूक यावेळी अधिक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. आपल्या कामावर विश्वास ठेवणारा आणि थेट जनतेतून पुढे आलेला हा युवक पंचायत समितीत पोहोचतो का, याकडे आता संपूर्ण ग्रामीण मतदारांचे लक्ष लागले आहे.