मलकापूर : – शहरातील ज्येष्ठ विधितज्ञ तथा माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांचे वडील ॲड. महादेवसिंह चंद्रसिंह रावळ (रा. शास्त्री नगर, मलकापूर) यांचे आज बुधवारी (दि. 11 ) सायंकाळी सुमारे 5.30 वाजता आजारपणामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वकिली क्षेत्रासह मलकापूर शहरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. ॲड. महादेवसिंह रावळ यांनी तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ वकिली व्यवसाय करत अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले. आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू स्वभावामुळे त्यांनी विधी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना न्यायाच्या लढ्यात आधार मिळाला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वकिली क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार व नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचा अंत्यविधी गुरुवार, दि. 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजता माता महाकाली नगर येथील स्व. लक्ष्मण हिरु चव्हाण वैकुंठधाम येथे शोकाकुल वातावरणात करण्यात येणार असून, त्यांची अंतिम यात्रा शास्त्री नगर येथून निघणार आहे.