Headlines

‘मी शेताकडे जातो’ म्हणत घराबाहेर पडला आणि परतलाच नाही; ऑटोचालकाची हत्या; धरणगावचा ऑटोचालक मृत्यू प्रकरणी आरोपी १२ तासांत गजाआड

मलकापूर:- तालुक्यात खळबळ उडवणाऱ्या धरणगाव (ता. मलकापूर) येथील ऑटोचालक अमोल भाऊराव भवरे (वय ३५) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अखेर वेगळी कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला मर्ग म्हणून नोंद झालेल्या या घटनेचा सखोल तपास करत दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत खुनाचा पर्दाफाश करत आरोपीला बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे परिसरात पोलीस तपासाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

७ जानेवारी रोजी सायंकाळीच्या सुमारास आरोपी दिनेश तायडे याचा अमोल भवरे यांना मोबाइलवरून फोन आला. फोनवर दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचे समोर आले आहे. “दिनेशचा फोन आला आहे, मी शेताकडे जातो,” असे पत्नीला सांगून अमोल रागाच्या भरात स्वतःची ऑटोरिक्षा घेऊन घराबाहेर पडले; मात्र त्या रात्री ते परतलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी, ८ जानेवारी रोजी सकाळी शिवनी–तालसवाडा रोडवर अमोलचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यावर दोरीने फाशी दिल्याचे व्रण, तोंडातून झालेला रक्तस्राव आणि एक हात फॅक्चर असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याचा संशय वर्तवन्यात येत होता. मात्र, सुरुवातीला कुटुंबीयांनी कोणावरही संशय नसल्याचे दर्शवल्याने पोलिसांनी मर्ग दाखल केला होता.
दरम्यान, मृतकाची पत्नी शितल अमोल भवरे (वय ३२) यांनी पतीची हत्या झाल्याची ठोस फिर्याद दिल्यानंतर प्रकरणाला गती मिळाली. एमआयडीसी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय खबरे, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळावरील पुरावे तपासून आरोपी दिनेश तायडे याला अटक केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम १०३ (१), २३८ (ब) अन्वये खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता व्यक्त केली असून तपास सुरू आहे. मर्गपासून खुनापर्यंतचा प्रवास उलगडत अवघ्या १२ तासांत आरोपीला गजाआड केल्याने एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!