मलकापूर ( दिपक इटणारे ) :- विकासाच्या गप्पा आणि प्रत्यक्षातील वास्तव यामध्ये प्रचंड दरी असल्याचे चित्र बहापुरा गावात पाहायला मिळत आहे. वडोदा, पान्हेरा आणि सावरगाव या तीन गावांना जोडणारा रेल्वे गेट ते बेलाड फाटा हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता अक्षरशः मृत्युपंथाला लागला असून, या रस्त्यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन पुरते विस्कळीत झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या बहापुरा ग्रामपंचायत सरपंचांसह सर्व गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मलकापूर यांना निवेदन देत तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की रेल्वे गेट ते बेलाड फाटा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असून, या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. मात्र सध्या हा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात माती साचलेली आहे. वाहनांच्या सततच्या ये-जा मुळे धुळीचे लोट उठत असून, ही धूळ थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. परिणामी लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, खोकला यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याबाबत यापूर्वीही अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदने देण्यात आली आहेत. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “रस्ता खराब असल्यामुळे शाळकरी मुले, रुग्णवाहिका, शेतकरी व दैनंदिन प्रवासी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार का?” असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या निवेदनाद्वारे ग्रामपंचायत बहापुरा व सर्व गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून रेल्वे गेट ते बेलाड फाटा हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी ठाम मागणी केली आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. निवेदन देतांना सरपंच देवीदास चव्हाण, उपसरपंच लक्ष्मण उमाळे, शरद सोनोने, गुलाब कुटे, गोपाल सोनोने, प्रकाश सोनोने, प्रसाद सोनोने, अनिल सातव, गौरव सातव, वसंता चित्रे, पवन घाटे, विनायक सातव, राजू सोनोने, मनोज सोनोने आदी उपस्थित होते.