मलकापूर ( दिपक इटणारे ) : जिल्ह्यात वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (स्थागुशा) मोठी कारवाई करत मलकापूर शहरातील भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाची यशस्वी उकल केली आहे. या प्रकरणात एका महिलेचा सहभाग निष्पन्न झाला असून तिला अमरावती येथून शिताफीने अटक करण्यात आली आहे. तिच्या ताब्यातून तब्बल ₹६,८१,००० किमतीचा मुद्देमाल सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी मलकापूर शहरातील चैतन्यवाडी भागात राहणारे रविकुमार शिवाजी राठोड हे दुपारी घराबाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील लॉकरमधील सोन्याची चैन, पोथ, अंगठ्या, गोफ, गहूमणी, ब्रेसलेट, मोबाईल आणि ₹१,७५,००० नगदी असा एकूण ₹५,२३,१५७ किमतीचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी पोलीस ठाणे मलकापूर शहरात गु. र. नं. ६३६/२०२५ भा. दं. सं. कलम ३८०(१), ४५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर (स्थागुशा-बुलढाणा) यांनी स्वतंत्र पथके तयार करून तपासाची सूत्रे हातात घेतली. या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सततच्या पाठपुराव्यानंतर आरोपी महिलेला अमरावती येथून ताब्यात घेतले. सिमा परवीन नसीम शेख (वय ४५ वर्षे, रा. हैदरपुरा, पो. स्टे. खोलापुरी गेट, अमरावती) तिच्या ताब्यातून सोन्याची चैन, तीन अंगठ्या, ब्रेसलेट, कानातील लटकन, तसेच ₹५०,००० रोख रक्कम असा एकूण ₹६.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत तिच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी व चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, पोकॉ गजानन गोरले, मपोकॉ आशा मोरे (स्थागुशा बुलढाणा) तसेच पोहेकॉ राजू आडवे (तांत्रिक विश्लेषण विभाग) यांनी सक्रिय सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे मलकापूर शहर यांच्यामार्फत सुरू आहे.