Headlines

संगणक शिक्षणाच्या आड लैंगिक छळाचा घृणास्पद प्रकार; क्लासरूमच बनली तरुणींसाठी असुरक्षित; मलकापूरातील धक्कादायक घटना

मलकापूर :जिथे भविष्यासाठी कौशल्य घडवलं जातं, तिथेच तरुणींच्या सन्मानावर हात घालण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मलकापूरमधील एका संगणक प्रशिक्षण संस्थेत शिकायला गेलेल्या तरुणीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे. शिक्षण संस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित १८ वर्षीय तरुणी एमएससीआयटी प्रशिक्षणासाठी एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे गेली असता, त्या ठिकाणी इतर कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आरोपीने अचानक गळ्यात हात टाकत छातीला अश्लील स्पर्श केल्याने तरुणी घाबरून गेली. या धक्कादायक घटनेनंतर पीडित तरुणीने हा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला असता, आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली. ऑगस्ट २०२५ मध्ये याच आरोपीने तिच्या मैत्रिणीचाही मिठी मारून अश्लील स्पर्श करत मानसिक व शारीरिक छळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीकडून वारंवार तरुणींचा विनयभंग झाल्याचा संशय बळावला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध BNS कलम ७४, ७९ व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. शिक्षण संस्थांमध्ये मुली सुरक्षित आहेत का, असा थेट सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!