मलकापूर : – तू माझा फोन का उचलत नाही असा जाब विचारत घरात घुसून पती-पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास विटाळी (ता. नांदुरा) येथे घडली. याप्रकरणी सौ. शितल प्रकाश लवटे (वय २७, रा. विटाळी ता. नांदुरा) यांनी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्या घरी स्वयंपाक करत असताना त्यांचे पती प्रकाश लवटे जेवण करत होते. त्यावेळी आरोपी आकाश प्रेमसुख काकर व प्रेमसुख चांगो काकर (रा. संताजी नगर, मलकापूर) हे त्यांच्या घरी आले. तुझा पती माझा फोन उचलत नाही असे म्हणत त्यांनी घरात प्रवेश करून प्रकाश लवटे यांना पकडून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. पतीच्या बचावासाठी शितल लवटे पुढे गेल्या असता आरोपी आकाश काकर याने त्यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी आरोपींनी तुमच्याकडे आमचे १ लाख ५० हजार रुपये बाकी आहेत, ते परत द्या. अन्यथा घरातील सामान बाहेर फेकून देऊ, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. झटापटीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तुटून पडल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उल्हास मुके करीत आहेत.