Headlines

रायझिंग डे सप्ताहानिमित्त मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम

मलकापूर:- मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने रायझिंग डे अर्थात पोलीस वर्धापन दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये कायदा-सुव्यवस्था, सुरक्षितता व पोलीस यंत्रणेच्या कार्याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून पोलीस व नागरिक, विशेषतः विद्यार्थी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दि. 06 जानेवारी 2025 रोजी पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण येथे पोलीस निरीक्षक सतीश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली देवधाबा येथील मोतीलाल संचेती विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाची माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांकडून वापरण्यात येणाऱ्या विविध हत्यारांची माहिती देत त्यांचे उपयोग, खबरदारी व कायदेशीर बाबी समजावून सांगण्यात आल्या.
कार्यक्रमादरम्यान ‘पोलीस काका पोलीस दीदी’ या जनजागृती उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना गुड टच-बॅड टच बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तक्रार पेटीमध्ये गोपनीयरीत्या तक्रार कशी द्यावी, पोक्सो कायद्याअंतर्गत मुलांच्या हक्कांचे संरक्षण, दामिनी पथकाची भूमिका व डायल 112 या आपत्कालीन सेवेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कोणतीही अडचण, छळ किंवा तक्रार असल्यास तात्काळ पोलीस काका-पोलीस दीदी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमाला 30 ते 40 विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षकवर्ग तसेच मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष अंमलदार उपस्थित होते. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता वाढून पोलीस यंत्रणेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!