जळगाव : मानवतेच्या सर्वोच्च प्रतीकाला उजाळा देणारी घटना रावेर तालुक्यातील मांगलवाडी येथे घडली आहे. येथील ५९ वर्षीय बाबुराव कोळी यांनी आपल्या किडनी विकाराने त्रस्त असलेल्या २९ वर्षीय मुलीला आपली किडनी दान करून तिला नवीन जीवन दिले.रुपाली योगेश कोळी (साळुंखे) (रा. चिंचोली, ता. यावल) या तरुणीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे ती अडीच वर्षांपासून डायलिसिसवर होती. तिच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. हार्दिक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. मुलीच्या त्रासाने व्यथित झालेल्या बाबुराव कोळी यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
वडिलांच्या या बलिदानामुळे रुपालीला जीवनदान मिळाले आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीलाही आईचं छत्र पुन्हा लाभलं. बाबुराव यांनी पदरमोड करून मुलीच्या उपचारांसाठी सर्वस्व पणाला लावले. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.हा प्रसंग वडील-मुलीच्या नात्याचं आणि निस्वार्थ प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण ठरला आहे. बाबुराव कोळी यांचं दातृत्व आणि त्याग संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे.