मलकापूर :- मलकापूर बुलडाणा मार्गानजीक पंचमुखी येथे दोन दुचाकीचा अपघात घडला. या अपघातात पवन अवसरमोल (वय २५, रा. आंबेडकर नगर) हा तरुण गंभीर तर तीन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना काल १५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिरानजीक घडली.या अपघातात गंभीर जखमी तरुणाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका किंवा ऑटो मिळाला नसल्याने घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार नारायण पानसरे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला आपल्या दुचाकीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, रुग्णालयात नेहमीप्रमाणे डॉक्टरच हजर नसल्याची गंभीर बाब समोर आली.रुग्णालयात उपस्थित परिचारिकेने प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात केली. यावेळी ऑन ड्युटी असलेल्या डॉ. खोकले यांना घटनेची माहिती देण्यात आली. परंतु एक तास उलटूनही डॉक्टर आलेच नाहीत. परिणामी त्या जखमी युवकाला योग्य उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे त्याला कोलते हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात गंभीर जखमी तरुणाच्या मित्र व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाला उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर हजर नसल्याने उपचार न मिळाल्याने जखमी तरुणाच्या नातेवाईकांनी व मित्रांनी संताप व्यक्त केला आहे.