Headlines

मलकापूरच्या जलसुरक्षेसाठी नगराध्यक्ष स्वतः मैदानात; धुपेश्वर येथील पूर्णा नदीवर नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांची सखोल पाहणी

मलकापूर (दिपक इटनारे ):शहराचा विकास केवळ इमारतींनी नव्हे, तर नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण झाल्यावरच खऱ्या अर्थाने साध्य होतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा. मलकापूरकरांना या मूलभूत सुविधेची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांनी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेत धुपेश्वर येथील पूर्णा नदी व पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. ३ जानेवारी रोजी झालेली ही पाहणी शहराच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांनी पाहणीदरम्यान पूर्णा नदीतील पाण्याची सद्यस्थिती, पाण्याची पातळी, साठवण क्षमता तसेच नदीवर आधारित संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेचा बारकाईने आढावा घेतला. पाणी उपसा केंद्र, शुद्धीकरण प्रकल्प, पाईपलाईनचे जाळे, वितरण व्यवस्था आदी प्रत्येक घटकाची सखोल तपासणी करण्यात आली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक माहिती घेत नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष जागेवर निरीक्षण करत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून व्यवस्थेतील अडचणी जाणून घेतल्या.
भविष्यात शहराची वाढती लोकसंख्या, वाढणारा नागरी विस्तार व पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता संभाव्य टंचाई टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर नगराध्यक्षांनी विशेष भर दिला.
यंत्रसामग्रीची कार्यक्षमता, देखभाल-दुरुस्तीची स्थिती, सुरक्षिततेच्या उपाययोजना तसेच आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी नियोजन याबाबतही त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. पाणीपुरवठा अधिक सक्षम, आधुनिक व दीर्घकालीन दृष्टीने टिकाऊ कसा करता येईल, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले म्हणाले, “मलकापूर शहरातील प्रत्येक नागरिकाला दररोज स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे ही नगर प्रशासनाची जबाबदारी आहे. या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर आम्ही स्वतः लक्ष ठेवणार आहोत. कार्यालयीन बैठका आणि अहवालांपुरते न थांबता प्रत्यक्ष स्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याची कार्यपद्धती नगराध्यक्ष जवारीवाले यांच्या प्रशासनाची ओळख ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून, मूलभूत सुविधांबाबत नगर प्रशासन गंभीर व कर्तव्यनिष्ठ असल्याची भावना अधिक बळकट होत आहे. जनहित हेच आपल्या कामाचे केंद्रबिंदू असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्टपणे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. पाणीपुरवठा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी नगर प्रशासन पूर्णतः कटिबद्ध असून, ही पाहणी मलकापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धारही नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला. या पाहणी प्रसंगी काँग्रेस नेते हाजी रशीदखा जमादार, अ‍ॅड. हरीश रावळ, अनिल गांधी, जाकिर मेमन यांच्यासह इतर मान्यवर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!