मलकापूर :- जिल्ह्यात डोके वर काढत असलेल्या संघटित गुन्हेगारीला कायमचा आळा घालण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मलकापूर येथील गाजलेल्या सतीश झाल्टे खून प्रकरणातील टोळीवर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्याच्या गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. जळगाव (खां) जिल्ह्यातील पिंप्राळा येथील सतीश गजानन झाल्टे यांची मलकापूर शहरात किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सहभागी असलेली टोळी यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या टोळीची परिसरात दहशत निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर टोळीचा म्होरक्या संकेत सुनील उन्हाळे (वय २२) याच्यासह त्याचे आठ साथीदार साहिल पालवे (१८), देव तिलकसिंग राजपूत (२४), गबऱ्या अजय साळुंखे (१९), गणेश वायडे (२१), हर्षल सुभाष घोगटे (२३, रा. मोताळा), कौशल संतोष घाटे (२२), आदित्य जनार्दन वानखेडे (२४) आणि ऋषीकेश रामलाल इंगळे (२३) सर्व रा. मलकापूर यांच्याविरुद्ध मकोका लावण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तयार केला. सदर प्रस्ताव अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रत्नाकर (रातनाथ) पोकळे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच सादर केलेल्या ठोस पुराव्यांची दखल घेत त्यांनी तातडीने मकोकाच्या कारवाईस मंजुरी दिली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या कठोर कारवाईमुळे मलकापूरसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला असून, पोलिसांच्या या निर्णायक भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे.