नगरपालिकेने ‘अभय योजना’ लागू करावी; अन्यथा तीव्र आंदोलन – चेतन अप्पा जगताप यांचा इशारा

मालकापूर: शहरातील सामान्य नागरिकांवरील मालमत्ता कराचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आणि नगरपालिकेची थकीत वसुली पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ‘अभय योजना’ (Amnesty Scheme) लागू करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन अप्पा जगताप यांनी केली आहे.
दंडामुळे नागरिक हतबल
शहरातील अनेक भागांत गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कर थकीत आहे. मात्र, या करावर लागणारे व्याज आणि दंडाची (शास्ती) रक्कम मूळ करापेक्षाही जास्त झाली आहे. “नागरिकांना कर भरण्याची इच्छा आहे, पण वाढीव दंडामुळे त्यांना ते शक्य होत नाहीये. प्रशासनाने हा दंड माफ केल्यास नागरिक उत्स्फूर्तपणे कर भरतील,” असे मत चेतन अप्पा जगताप यांनी व्यक्त केले.
विकासकामांसाठी निधीची गरज
शहरात सध्या दूषित पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, नादुरुस्त पथदिवे आणि स्वच्छतेचे प्रश्न गंभीर आहेत. पालिकेकडे निधी नाही, असे कारण नेहमी दिले जाते. जर अभय योजना राबवून थकीत कर वसूल केला, तर नगरपालिकेच्या तिजोरीत मोठा निधी जमा होईल आणि शहराच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. इतर शहरांच्या धर्तीवर मलकापूर नगरपालिकेनेही १००% दंड माफीची योजना जाहीर करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. जर प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार केला नाही, तर आगामी काळात नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा चेतन अप्पा जगताप यांनी दिला आहे. सामान्य माणसाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यांना दंडाच्या जाचातून मुक्त करून सन्मानाने कर भरण्याची संधी नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी, हीच आमची प्रमुख मागणी आहे.” चेतन अप्पा जगताप (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मलकापूर अध्यक्ष अप्पा प्रतिष्ठान )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!