Headlines

तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे; प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांचे आवाहन

तालुका विधी सेवा समिती व वकील संघ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘ड्रग्ज फ्री इंडिया’ जनजागृती शिबीर उत्साहात

मलकापूर (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. व्यसनांचे दुष्परिणाम केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीस अडथळा ठरतात. त्यामुळे तरुणांनी सजग राहून व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी केले.
स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवक दिन) निमित्त मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ‘ड्रग्ज फ्री इंडिया : युथ फॉर वेलनेस’ या विषयावर कायदेशीर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाविद्यालयाच्या सहकार्याने पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चें यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना न्यायाधीश रोकडे यांनी तरुणांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून सकारात्मक, शिस्तबद्ध व निर्व्यसनी जीवन जगावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कुणाल शेवाळे यांनी व्यसनांचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम स्पष्ट करत व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर. बी. गिरी यांनी ‘पॉस्को’ कायद्याबाबत सविस्तर माहिती देत युवकांमध्ये कायदेशीर साक्षरता निर्माण होण्याचे महत्त्व पटवून दिले. तालुका विधी सेवा समिती, मलकापूरचे अध्यक्ष व जिल्हा न्यायाधीश-१, मलकापूर यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली सुमारे ५०० युवक-युवतींनी ‘नशा मुक्त भारत’ची शपथ घेतली. युवकांमध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण करणे आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब करण्याची प्रेरणा देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या प्रसंगी वकील संघाचे माजी अध्यक्ष विधिज्ञ जी. व्ही. सोमण, सरकारी वकील व्ही. एम. बापट, गारमोडे, ॲड. जयंत तायडे, ॲड. विशाल इंगळे यांच्यासह वकील संघाचे इतर सभासद, महाविद्यालयाचे प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समिती व महाविद्यालयीन प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. यावेळी दिवसभर स्वतंत्ररित्या युवक-युवतींसाठी डॉक्टरांकडून समुपदेशनही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!