Headlines

दसरखेड टोलनाक्यावर अवैध वाळू वाहतूक; टिपर जप्त, एकावर गुन्हा दाखल

मलकापूर:- तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट वाढत असताना दसरखेड टोलनाका परिसरात एमआयडीसी मलकापूर पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहून नेणारा टिपर जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी मलकापूर (दसरखेड) पोलीस ठाण्यात कलम 303(2) BNS सह कलम 21(1), 21(2) गौणखनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात रोशन तेजराव मुंडाळे (वय 25, रा. बेलाड, ता. मलकापूर) असे आरोपीचे नाव आहे.
ही घटना दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास दसरखेड टोलनाका येथे घडली असून गुन्हा त्याच दिवशी रात्री दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारतर्फे फिर्यादी विजय टेकाडे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे दसरखेड टोलनाक्यावर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांच्या दिशेने येणारा अशोक लेलँड कंपनीचा 1215 मॉडेलचा पिवळ्या रंगाचा टिपर (क्र. MH 28 BB 8392) संशयास्पदरीत्या थांबविण्यात आला.
वाहन चालकाची चौकशी केली असता टिपरमध्ये वाळू असल्याचे निष्पन्न झाले. मात्र सदर वाळू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना अथवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. पंचनामा करून तपासणी केली असता टिपरमध्ये अंदाजे 02 ब्रास वाळू आढळून आली. या कारवाईत टिपर वाहन (अंदाजे किंमत 12 लाख रुपये) व वाळू (किंमत 20 हजार रुपये) असा एकूण 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!