Headlines

मलकापूरकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही फोल ठरू देणार नाही – नगराध्यक्ष अतीक जवारीवाले

मलकापूर ( दिपक इटणारे ) मलकापूर शहराच्या राजकीय इतिहासात केवळ सत्ता बदल नव्हे, तर दृष्टीकोन बदलणारा निर्णय म्हणून अलीकडील नगरपरिषद निवडणुकीकडे पाहिले जात आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अतीक उर रहमान जवारीवाले यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि मलकापूरकरांनी त्यावर शिक्कामोर्तब करत भरभरून जनादेश दिला. ही केवळ निवडणूक विजयाची गोष्ट नसून, जनतेने स्पष्ट, प्रामाणिक आणि शब्द पाळणाऱ्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
नगरपरिषद शपथग्रहण सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून लोकशाही, समता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना उजाळा देण्यात आला. या पवित्र वातावरणात लोकनियुक्त नगराध्यक्ष अतीक जवारीवाले यांनी पदाची शपथ घेतली आणि मलकापूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला. शपथग्रहणानंतर बोलताना अतीक जवारीवाले यांनी कोणतीही फाजील घोषणा न करता थेट कामावर भर देणारी भूमिका स्पष्ट केली. “मलकापूरकरांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, तो मी कधीही फोल ठरू देणार नाही. नगराध्यक्षपद हा माझ्यासाठी अधिकार नसून सेवा करण्याची संधी आहे. मी दिलेला प्रत्येक शब्द कृतीत उतरवण्याचा माझा स्वभाव आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडल्या. सार्वजनिक पुतळ्यांचे सुशोभीकरण करून शहराचा सांस्कृतिक सन्मान वाढवणे, रस्ते व नाल्यांची दर्जेदार दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देणे, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे, या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड न करता काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी दिला. विकासाच्या प्रक्रियेत राजकारण न करता सर्व नगरसेवक, अधिकारी आणि नागरिकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अतीक जवारीवाले यांच्या नेतृत्वशैलीचे कौतुक केले. माजी आमदार राजेश एकडे, प्रदेश सरचिटणीस डॉ. अरविंद कोलते, माजी नगराध्यक्ष हाजी रशीद खाँ जमादार, माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी शहराच्या विकासासाठी काँग्रेसने योग्य नेतृत्व निवडल्याचा विश्वास व्यक्त केला. तहसीलदार समाधान सोनवणे, नगरपरिषद मुख्याधिकारी संजय केदार, ठाणेदार गिरी यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती या सोहळ्याला प्रशासकीय पाठबळ देणारी ठरली. नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती ही अतीक जवारीवाले यांच्यावरील जनतेच्या अपेक्षा आणि विश्वासाचे प्रतीक होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पवार यांनी केले, तर अॅड. शाहिद शेख यांनी आभार प्रदर्शन केले. आज मलकापूरकरांना केवळ आश्वासनांचा नेता नको, तर कामातून विश्वास निर्माण करणारा नगराध्यक्ष हवा आहे. अतीक उर रहमान जवारीवाले यांनी घेतलेली भूमिका आणि दाखवलेली स्पष्टता पाहता, मलकापूरच्या विकासाचा हा प्रवास केवळ बोलण्यात न राहता प्रत्यक्षात दिसेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!