Headlines

तिकीट वाटपातील अन्यायाचा स्फोट; मलकापूर भाजपात राजीनाम्यांची मालिकाच; सच्च्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप; शहर उपाध्यक्ष अमोल टप यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मलकापूर : नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीनंतर मलकापूर भाजपामध्ये अंतर्गत नाराजीचा उद्रेक होत असून, तिकीट वाटपात सच्च्या व मेहनती कार्यकर्त्यांना डावलून केवळ चेहरे व संबंध पाहून उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप करत भाजपाचे शहर उपाध्यक्ष अमोल टप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज, २४ डिसेंबर रोजी, आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष संतोष बोंबटकार यांच्याकडे सादर केला. या राजीनाम्यांमुळे भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची तीव्र भावना राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. अमोल टप यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, ते गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून, शहरातील पक्षसंघटन वाढीसाठी तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आंदोलने, मोर्चे व पाठपुरावा केला आहे. ते राहत असलेल्या प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्ष केला असून, ते बुथ क्रमांक १७० चे बुथ प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रभाग ३-अ मधून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष करत राजकीय द्वेषभावनेतून आपल्याला व सहकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही कार्याची दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करत, या अन्यायकारक भूमिकेविरोधात सामूहिक निर्णयाने राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे राजीनामा पत्रात नमूद करण्यात आले आहे. अमोल लक्ष्मणराव टप (शहर उपाध्यक्ष, भाजपा मलकापूर) यांच्यासह राजकुमार वानखेडे (शहराध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग), सौ. दुर्गा राजकुमार वानखेडे (शहर चिटणीस), अमोल पाटील, अमोल मोरे, रोहित कांडेलकर, पंकज पाटील, सुरज टप, प्रसाद टप, अनेश साखळीकर, विरेंद्र कासे, मंगेश चंदनकार, मयुर बुडुकले, जय वाघमारे, अक्षय लामखेडे, स्वप्नील भिसे आदींनी आपल्या पदाचा तसेच भाजपाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडींमुळे मलकापूर भाजपामध्ये संघटनात्मक फूट अधिक ठळक होत असून, आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!