मलकापूर:- जिल्ह्यात अवैध दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संपूर्ण पाठिंब्याने जोमाने सुरू असून, प्रशासनाने डोळेझाक करून या व्यवसायाला मोकळीक दिल्याचा आरोप होत आहे. अधिकृत वाईन बार डावलून ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात दारू खुलेआम विकली जात असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
प्रशासनाची निष्क्रियता म्हणजे गुन्हेगारांना खुलं आमंत्रण?
वाईन बारमधील दारूसाठी ग्राहकांना ₹२५० मोजावे लागत असताना, ढाब्यांवर तीच दारू ₹१८० मध्ये मिळत आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाबामालकांना कोणताही सरकारी टॅक्स भरावा लागत नाही. त्यामुळे त्यांना मोठा नफा मिळत असताना, अधिकृत वाईन बारमालक मात्र प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांमुळे तोट्यात जात आहेत.
अधीक्षकांचा हात असल्याचा गंभीर आरोप!
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याऐवजी, स्वतःच या गोरखधंद्याला पाठबळ देत असल्याची जोरदार चर्चा आहे. ढाब्यांवर खुलेआम विक्री सुरू असतानाही प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
वाईन बारमालकांनी “जिल्हा अधीक्षक आणि ढाबामालकांमध्ये आर्थिक देवाणघेवाण सुरू असून, त्यांच्यावर तातडीने चौकशी करावी,” अशी मागणी केली आहे. प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा सारा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
अवैध दारूमुळे गुन्हेगारी वाढली – पोलीसही गप्प!
अवैध दारू विक्रीमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ढाब्यांवर रोजच वाद, मारामाऱ्या आणि गुन्हेगारी घटना घडत आहेत. तरीही पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग मूग गिळून गप्प बसले आहेत.
लोकशाही की भ्रष्टशाही?
जिल्ह्यात अवैध दारू विक्री प्रशासनाच्या आश्रयाने खुलेआम फोफावत आहे. ही बाब फक्त भ्रष्टाचाराचाच नव्हे, तर प्रशासनाच्या संपूर्ण अपयशाचा दाखला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही, जबाबदार अधिकारी हातावर हात ठेवून बसले आहेत.
या भ्रष्ट कारभाराविरोधात तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहू शकते, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.