Headlines

शेतात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; ओळख पटविण्याचे साखरखेर्डा पोलिसांचे आव्हान.

साखरखेर्डा — ग्राम लव्हाळा येथील शेतात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षांदरम्यान असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
शेतकरी साहेबराव सवळतकर यांच्या शेतात सदर मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. विशेष बाब म्हणजे या व्यक्तीवर कोणतेही कपडे नव्हते. स्थानिकांच्या सांगण्यानुसार, सदर इसम गेल्या काही दिवसांपासून परिसरात अर्धवट अवस्थेत फिरत असल्याचे पाहिले गेले होते. त्यामुळे हा इसम मानसिक रुग्ण असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मृतदेहाजवळ कोणतीही ओळख पटवणारी वस्तू आढळून आलेली नाही. त्यामुळे साखरखेर्डा पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या इसमाबाबत कुणालाही काही माहिती असल्यास त्यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!