जानेफळ: खुदनापूर येथील महादेव मंदिरातील धार्मिक वस्तू चोरी करून नेत असताना गावकऱ्यांनी तिघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले. या घटनेने गावात खळबळ माजली असून आरोपींकडून चोरी केलेल्या वस्तूंसह त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. १५ जानेवारी रोजी गावातील महादेव मंदिरातून तिघेजण काही वस्तू चोरी करून पळत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पाठलाग करून आरोपींना पकडले. त्यांच्या जवळून पितळी त्रिशूल, डमरू आणि काशा धातूची घंटा असा एकूण ५,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोस्टे जानेफळचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. अरविंद चव्हाण, विनोद फुफटे आणि पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून आरोपी उमेश रमेश मोरे (वय २४), महेश रमेश मोरे (वय २२) आणि एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. पोलीस तपासानंतर उमेश व महेश मोरे या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन बालकास बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
महादेव मंदिरातील साहित्यावर चोरट्यांची काळी नजर.. गावकऱ्यांनी तीन चोरट्यांना रंगेहाथ पकडले, खुदनापूर येथील घटना!
