मलकापूर : स्थानिक लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात सामूहिक सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कला व गुणांना वाव देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते विजय अंबुसकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या सौ. काळपांडे मॅडम, उपमुख्याध्यापक निंबोळे सर तसेच पर्यवेक्षक तोमर सर उपस्थित होते. प्रमुख वक्ते अंबुसकर पुढे म्हणाले की, भारत हा अध्यात्माची जननी असून भारतीय संस्कृती ही रूढी, परंपरा व धर्मावर आधारलेली आहे. त्यातूनच विविध उत्सवांच्या माध्यमातून आपण पूजा-अर्चा करतो. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, मनःशांती आणि ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीचे पूजन आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गांची आकर्षक सजावट केली होती. पताका, रांगोळ्या व फुलांच्या माळांनी सजलेल्या वर्गांमुळे संपूर्ण शालेय परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. कार्यक्रमाची प्रस्तावना व संचालन सौ. कुसुंबे मॅडम यांनी केले. शेवटी सरस्वती मातेची आरती करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.