मलकापूर :- काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू वाहतुकीचे तब्बल आठ टिप्पर पकडून वाळू माफियांना जोरदार धक्का दिला होता. त्या कारवाईची शाई अजूनही सुखलेली नसतानाच, पुन्हा एकदा एमआयडीसी पोलिसांनी कायदा सर्वांसाठी समान आहे, हे ठामपणे दाखवून दिले आहे. कर्तव्यदक्ष ठाणेदार एपीआय नरेंद्र पेंदोर यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी पोलिसांनी दसरखेड एमआयडीसी गेट परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर धडक कारवाई करत 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई ₹ जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, ॲडिशनल एसपी श्रेणिक लोढा व एसडीपीओ आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणी कलम 303 (2) BNS सह कलम 21 (1), 21 (2) ) गौणखनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रशांत पाटील पोरटे हे पोलीस पथकासह पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत ग्राम म्हैसवाडी शिवारातून मलकापूरकडे शासनाचा महसूल बुडवून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन दसरखेड एमआयडीसी गेटजवळ नाकाबंदी केली. त्यावेळी संशयास्पद अशोक लेलँड कंपनीचा पिवळ्या रंगाचा टिप्पर (MH 28 BB 4974) पोलिसांच्या दिशेने येताना दिसून आला. पोलिसांनी सदर टिप्पर थांबवून चालकाची चौकशी केली असता, त्याने आपले नाव मयूर रमेश उजैनकर (वय 22, रा. समर्थ नगर, मलकापूर) असे सांगितले. पोलिसांनी टिप्परमधील मालाबाबत विचारणा केली असता, वाहनात वाळू असल्याचे चालकाने कबूल केले. मात्र, वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना त्याच्याकडे नसल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. पाहणीअंती टिप्परमध्ये अंदाजे 02 ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी पंचासमक्ष 12 लाख रुपये किमतीचा टिप्पर व 20 हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एपीआय नरेंद्र पेंदोर, हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, चालक संदीप कळसकर यांच्या सहभागाने पार पडली असून, गुन्ह्याची नोंद एएसआय सरदारसिंग कुवारे यांनी केली आहे. पुढील तपास एएसआय विजय टेकाडे हे करीत आहेत. सातत्याने होत असलेल्या अशा कारवायांमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलिसांच्या कठोर भूमिकेमुळे “कायदा मोठा आहे आणि तो मोडणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे” हा स्पष्ट संदेश पुन्हा एकदा देण्यात आला आहे.