चिखली : खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध उत्खनन करून लपवून ठेवलेल्या सुमारे १३६ ब्रास रेतीवर महसूल विभागाने धडक कारवाई केली. देऊळगाव घुबे शिवारातील गट क्रमांक ६२७ मध्ये या रेतीचा साठा आढळून आला.
तपासादरम्यान, पंजाब दिनकर घुबे यांच्या मालकीच्या जागेत ३० ब्रास, परसराम पांडुरंग घुबे यांच्या जमिनीवर २० ब्रास, तर कांताबाई विजय घुबे यांच्या शेतात ५० ब्रास रेती साठवून ठेवलेली होती. महसूल विभागाच्या तलाठी वैशाली गवई आणि मंडळ अधिकारी सोनुने यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. कारवाईदरम्यान पंच म्हणून निवृत्ती दगडुबा घुबे, समाधान विजय घुबे, संतोष गजानन घुबे आणि पोलिस पाटील हरीभाऊ जाधव यांची उपस्थिती होती. खडकपूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने तत्काळ पावले उचलत ही कारवाई केली. त्यामुळे अवैध रेती उत्खनन आणि साठवणूक करणाऱ्यांवर वचक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.