मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शाळेतील नियुक्तीविषयक वाद न्यायालयात प्रलंबित असताना प्रकरण मागे घेण्याचा दबाव टाकत शिक्षकाच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण सोसायटी, मलकापूर येथे राहणाऱ्या अॅड. किरण योगेश फासे (वय ३७) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती योगेश वामन फासे हे लि. भो. चांडक विद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात उच्च माध्यमिक स्तरावर अंशतः अनुदानित तत्त्वावर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, हे प्रकरण मागे घ्यावे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. तक्रारीनुसार, शाळेच्या व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींनी न्यायालयीन प्रकरण मागे न घेतल्यास पतीचे आयुष्य उद्ध्वस्त करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात नगर सेवा समितीचे कार्यवाह तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक जयंत मुकुटराव राजूरकर, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक गिरीश वैद्य, संबंधित शिक्षीकेचे पती राहुल देशमुख आणि संबंधित शिक्षीकेचे नातेवाईक व ग्रंथपाल भरत देशमुख यांचा समावेश आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी २७ डिसेंबर रोजी चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. शैक्षणिक संस्थांतील नियुक्तीच्या वादातून अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जाणे गंभीर बाब असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.