मलकापूर: लक्ष्मी नगर परिसरातील रहिवाशांनी नाल्यांच्या सफाईबाबत आणि डासांवर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नाल्यांमध्ये साचलेले पाणी व घाणीमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असून, परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे रहिवाशांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, या समस्येमुळे लहान मुले, वृद्ध, आणि आजारी व्यक्तींना संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. प्रशासनाने वेळेत कार्यवाही न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी मलकापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करून नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची आणि डासांवर नियंत्रणासाठी औषध फवारणी करण्याची मागणी केली आहे. “जर प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना झाली नाही, तर पुढील स्तरावर तक्रार करावी लागेल,” असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. या विषयावर प्रशासन काय पावले उचलणार, याकडे लक्ष राहणार आहे. निवेदनावर दीपक बावस्कर, राम राखोंडे, राज डवले, अमोल बावस्कर, दीपक राऊत यांच्या स्वाक्षरी आहे.