मलकापूर : – संत रोहिदासनगर परिसरात जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणावर लोखंडी कड्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून दोन जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र भारत पठे (वय २१) हे १७ फेब्रुवारी रोजी घरासमोर उभे असताना आरोपी विशाल रामलाल बछीरे (२५) व प्रमोद नंदु खुर्दे (२४) हे तेथे आले. पूर्वीच्या वादातून निर्माण झालेल्या रागातून विशाल याने हातातील लोखंडी कड्याने विरेंद्र यांच्या डोक्यावर वार केला. या प्रहारात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार करण्यात आली आहे. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विरेंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रवींद्र दळवी करीत आहेत.