जळगाव जामोद : कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर जळताना पाहण्याची वेळ एका शेतकरी कुटुंबावर आली. ततारपूर शेतशिवारात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत कापणीसाठी तयार असलेला अडीच एकर मका जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना २८ मार्च रोजी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास घडली. या आगीत पीकासह शेतीपयोगी साहित्यही भस्मसात झाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद शहरालगत असलेल्या ततारपूर शेत शिवारात शेतकरी शकुंतलाबाई लक्ष्मण बनकर यांच्या शेतात कापणीसाठी तयार असलेला मका उभा होता. अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण अडीच एकर क्षेत्रातील मका जळून खाक झाला. शेतकरी व ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या आगीत मका पिकासह स्प्रिंकलर पाईप, शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर उपकरणे देखील जळून खाक झाली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतामधील विद्युत खांबावरील तार मोठ्या प्रमाणात सैल झाल्यामुळे वाऱ्याच्या घर्षणातून शॉर्ट सर्किट होऊन आग लागली, अशी तक्रार शेतकरी श्याम तायडे यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, या घटनेत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित वीज वितरण कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. दरम्यान, कापणीच्या उंबरठ्यावर आलेले पीक काही क्षणात जळून गेल्याने बनकर कुटुंबीयांवर आर्थिक तसेच मानसिक आघात झाला असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.