मलकापूर :- स्थानिक नूतन इंग्लिश स्कूलचा अभिमान वाढवत कु. कृष्णा राजेश पाटील हिने राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद पुणे (बारामती) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२५ मध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या गटातून कृष्णाने प्रभावी खेळ सादर केला.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात प्रगती साधावी या हेतूने आयोजित ही स्पर्धा २८ नोव्हेंबर रोजी पार पडली. उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर कृष्णाची मध्य प्रदेशच्या देवास येथे होणाऱ्या राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कृष्णाच्या यशाबद्दल स्पोर्ट झोन ऑफ मलकापूर, लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय संचालक मंडळ, प्राचार्य सुरेश खर्चे, उपप्राचार्य अमोल चोपडे, प्रदीप कोलते, क्रीडा शिक्षक आकाश लटके, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.