जनतेच्या दुःखातही सहभागी होणारे मंत्री प्रतापराव जाधव यांची दसरखेड येथे सांत्वनपर भेट

मलकापूर : नेहमीच लोकाभिमुख व सहृदय वृत्तीमुळे ओळखले जाणारे केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय करून दिला. व्याघ्रा नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू पावलेल्या दसरखेड येथील दोन अल्पवयीन मुलांच्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी स्वतः दसरखेड गाठीत जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी परिवारातील सदस्यांना धीर देत शासनाकडून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अर्थसहाय्य तातडीने मिळावे यासाठी तहसीलदारांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
दसरखेड येथील शुभम राजू दवंगे (१६) व सोहम वासुदेव सोनोने (१५) हे दोघे जण २८ सप्टेंबर रोजी शिवणी रस्त्यावरील निंबोळी गावाजवळील केसोबा मंदिर परिसरात पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यूमुखी पडले होते. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तालुका प्रमुख विजय साठे यांच्याकडून चौकशी करून माहिती घेतली व दुसऱ्याच दिवशी २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ते थेट दसरखेड येथे दाखल झाले. या वेळी त्यांनी मृतक मुलांच्या कुटुंबीयांना धीर देत दुःखात त्यांच्यासोबत उभे असल्याचा दिलासा दिला. तसेच तहसीलदार राहुल तायडे यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून तातडीने अर्थसहाय्य देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना दिल्या.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, तालुका प्रमुख विजय साठे, मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर, शरदचंद्र पाटील, डॉ. गोपाल डिके, कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!