Headlines

खोरेश्वर परिसरातील वॉटर पार्कमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू; निष्काळजीपणाचा संशय

देऊळगाव राजा : शहरातील खोरेश्वर महादेव मंदिर परिसरालगत असलेल्या वॉटर पार्कमध्ये पाण्यात बुडाल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार (९ एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वॉटर पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मृत तरुणाचे नाव शुभम भास्कर सदावर्ते (वय २२, रा. शेवली नेर, जि. जालना) असे आहे. तो संभाजीनगर येथे खासगी कंपनीत नोकरी करत होता. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त तो देऊळगाव राजा येथे आला होता. या दरम्यान मित्रांसोबत फिरण्यासाठी तो वॉटर पार्कमध्ये गेला होता. माहितीनुसार, वॉटर पार्कमधील पाण्यात खेळत असताना शुभम अचानक खोल भागात गेला आणि पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी मित्रांनी प्रयत्न करून बाहेर काढले व तातडीने रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर वॉटर पार्कमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनास्थळी प्रशिक्षित लाइफगार्ड उपस्थित होते का, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली होती का, याबाबत चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, शुभमच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. काही काळ घटनास्थळी तणावपूर्ण वातावरणही निर्माण झाले होते. देऊळगाव राजा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!