मलकापूर –भारतीय लष्कराने अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे देशभरात कौतुक होत असताना, या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या शूर महिला अधिकारी लेफ्टिनेंट सोफिया कुरैशी यांच्याविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शहा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसने राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.
सदर निवेदन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राहुलजी बोंद्रे, पक्षनेते आमदार राजेश एकडे आणि डॉ. अरविंद कोलते यांच्या सूचनेनुसार, जेष्ठ नेते श्यामभाऊ राठी, हाजी रशीदखा जमादार, ॲड. हरीश रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिलेले असतानाही, भाजपचे केंद्रीय व राज्य नेते संबंधित मंत्र्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे विजय शहा यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी काँग्रेसची मागणी आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना राजू पाटील, श्यामभाऊ राठी, रशीदखा जमादार, सुहास (बंडू) चवरे, प्रमोद अवसरमोल, अता मास्टर जमादार, गिरीश देशमुख, मंगलताई पाटील, पंचाफुला पाटील, अनिल भारंबे, तुषार पाटील, जाकिर मेमन, अशोक मराठे, युसुफ खान, वाजिद पत्रकार, अनिल तांदुळकर, उस्मान मास्टर, ईश्वर भदाले, विनय काळे, साजिद खान, फिरोज खान, हरिषदाद सूपडू, सनाउल्ला जमादार, असगर जमादार, कलीम पटेल, मो. जाकिर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.