Headlines

“पोलीस फक्त रक्षकच नव्हे, तर माणुसकीचे प्रतीकही!” मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे यांचा थंडीतील माणुसकीचा दीप: बेघरांना दिला उबदार आधार

मलकापूर( दिपक इटणारे ):- कडाक्याच्या थंडीत अनेकांच्या अंगावर शाल असते, पण काहीजणांना उबही मिळत नाही. अशा परिस्थितीत मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणुसकीचा झरा जागवला. पेट्रोलिंगच्या दरम्यान रस्त्यावर उघड्यावर झोपलेली बेघर चिमुकली मुले आणि वृद्ध त्यांना दिसले. थंडीने गारठलेल्या या व्यक्तींकडे स्वत:ला उब देण्यासाठी कोणताच आधार नव्हता.

ही हृदयस्पर्शी स्थिती पाहून पो. निरीक्षक काळे आणि त्यांच्या टीमने तत्काळ निर्णय घेतला. आपल्या खिशातून पैसे खर्च करत त्यांनी उबदार ब्लॅंकेट्स विकत घेतली आणि थरथरत झोपलेल्या प्रत्येकाला उबदार शाल अर्पण केली.
“पोलिसांचे कर्तव्य फक्त कायदा राखण्यापुरते मर्यादित नाही; समाजातील प्रत्येकाला आधार देणे, त्यांचे दुःख समजून घेणे हेही आमचे काम आहे,” असे निरीक्षक काळे यांनी नम्रतेने सांगितले. या कृतीने मलकापूर पोलिसांनी माणुसकीचे नाते अधोरेखित केले. या संवेदनशीलतेची व्हिडीओ प्रसारित होताच नागरिकांनी पोलिसांचे भरभरून कौतुक केले. “थंडीच्या अंधाऱ्या रात्रीतील हा माणुसकीचा दीप अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दाखवलेली ही संवेदनशीलता समाजासाठी एक मोठा संदेश आहे – माणुसकी टिकली तर समाज उबदार होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!