Headlines

जळगाव खान्देश विवाह सोहळ्यासाठी निघालेले बेपत्ता दाम्पत्यचा सीसीटीव्हीने उलगडला भीषण अपघाताचा सत्यकथन

मलकापूर/नांदुरा:- जळगाव खान्देश येथे नात्यातील विवाह सोहळ्यासाठी आनंदाने निघालेला प्रवास क्षणात काळ बनला. तेलंगणातून कारने निघालेल्या पती-पत्नीचे बेपत्ता होणे, त्यानंतर तिसऱ्याच दिवशी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कारसह दोघांचे मृतदेह सापडणे या संपूर्ण प्रकरणाने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र या भीषण दुर्घटनेचे खरे कारण सीसीटीव्ही फुटेजसमोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

तेलंगणातील सूर्यपेठ जिल्ह्यातून जळगाव खान्देशकडे जात असताना पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा येथील पद्मसिंह दामू पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता पाटील हे दाम्पत्य 27 नोव्हेंबरच्या सायंकाळी वडनेर भोलजी शिवारातून रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते. नांदुरा पोलिसांनी मिसिंगची नोंद करून शोधमोहीम सुरू केली होती.
दरम्यान, 29 नोव्हेंबर रोजी वडनेर भोलजीजवळील विश्वगंगा हॉटेल परिसरात झाडाझुडपांनी झाकलेल्या पडक्या विहिरीत कार आढळून आली. कारमध्येच दोघांचे मृतदेह सापडताच अपघात की काही वेगळे? असा प्रश्न निर्माण झाला होता. याच दरम्यान मृत पाटील यांचे चुलत भाऊ संदीप पाटील आणि नातेवाईकांनी हॉटेल विश्वगंगा येथील सीसीटीव्हीची तपासणी केली. फुटेजमध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनाने पाटील यांच्या कारला अचानक कट मारलेला दिसून आला. या धक्क्यामुळे कार नियंत्रण सोडून थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याचे स्पष्ट झाले. या पुराव्यावरून अज्ञात वाहन चालकाचाच निष्काळजीपणा दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नांदुरा पोलिसांनी 10 डिसेंबर रोजी त्या वाहनचालकाविरुद्ध कलम 281, 106 BNS सहकलम 119, 134 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी फिर्याद संदीप रमेश पाटील (वय 50, रा. वाघुळखेडा ता. पाचोरा) यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अचानक संपलेल्या दोन जीवांच्या या शोकांतिकेने परिसरात अत्यंत शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!