Headlines

उपजिल्हा रुग्णालयातील यशस्वी डायलिसिस सेंटरमुळे रुग्णांना दिलासा; डॉक्टरांचा सत्कार

मलकापूर : तालुक्यातील मूत्रपिंड विकाराने त्रस्त रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरत असलेले मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर आज आरोग्यसेवेचा महत्त्वपूर्ण आधार बनले आहे. याआधी डायलिसिससाठी बाहेरगावी धावपळ करणाऱ्या रुग्णांना आता स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळू लागल्याने त्यांचा वेळ, खर्च व मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या यशस्वी आणि रुग्णाभिमुख सेवेसाठी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अन्यायग्रस्त जनतेचे व्यासपीठ या सामाजिक संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते अमोल टप यांच्या पुढाकाराने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उंबरकर तसेच डायलिसिस सेंटरचे तंत्रज्ञ मयूर वर्मा यांचा संघटनेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उंबरकर यांनी सांगितले की, “मलकापूर तालुक्यातील ज्या रुग्णांना यापूर्वी डायलिसिससाठी बाहेरगावी जावे लागत होते, त्यांनी आता उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरचा लाभ घ्यावा. रुग्णांसाठी सुरक्षित, सुलभ व नियमित सेवा देण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संघटनेचे पदाधिकारी कृष्णा मेसरे यांनी सांगितले की, “मलकापूर येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना किंवा नागरिकांना रुग्णालयासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास समाजसेवक अमोल टप किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना सदैव तत्पर राहील,” असे आवाहन त्यांनी केले.
उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमुळे रुग्णांचे आरोग्य सुरक्षित राहत असून कुटुंबीयांवरील आर्थिक ओझेही हलके झाले आहे. ही आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने सुरू राहावी, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित नागरिक व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!