मलकापूर : पद्मश्री डॉ. वि. भिं. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज, मलकापूर येथे १२ ते १८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान १२० विद्यार्थ्यांना इंटर्नशीप एवं स्किल, इंडस्ट्री एम्प्लॉयबिलिटी व मेंटरींग प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण सेन्साटा टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. पुणे यांच्या सीएसआर निधीतून लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. डिवाइस इलेक्ट्रॉनिक, पुणे यांच्या प्रशिक्षकांनी हे प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी डिवाइस इलेक्ट्रॉनिक पुणे आणि लेवा भ्रातृमंडळ संस्थेच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. प्रशिक्षणादरम्यान सेन्सर्स, आयओटी कनेक्टिव्हिटी, सिक्युरिटी, मायक्रोकंट्रोलर प्रोग्रॅमिंग, बेसिक इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन, टीम प्रोजेक्ट डेव्हलपमेंट यासारख्या विविध तांत्रिक विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना प्रॅक्टिकलसाठी किट पुरवण्यात आल्या.
१७ फेब्रुवारी रोजी सेन्साटा टेक्नॉलॉजी च्या विशेषज्ञांनी सोल्डरिंग, वायरिंग, बॅटरी व ईव्ही टेक्नॉलॉजी, मुलाखत कौशल्य यावर सखोल मार्गदर्शन केले. १८ फेब्रुवारी रोजी बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफ सायकल यावर प्रेझेंटेशन आणि लाईव्ह डेमो घेण्यात आले.
प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. विशेष म्हणजे भाग्यश्री राजपूत हिने प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी एक उत्कृष्ट प्रॅक्टिकल करत त्याचा व्हिडिओ तयार केला.