धुळे, शिरपूर – शिवप्रतिष्ठान संघटनेच्या तालुकाप्रमुखावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कांतीलाल पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे शिरपूर पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एका सोशल मीडिया पोस्टवर काही व्यक्तींनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली. प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी दोन अल्पवयीन आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले, तर उर्वरित दोघे फरार असून त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील गस्तीसाठी जात असताना जमाव जमा झाल्याचे पाहून त्यांनी हस्तक्षेप केला. त्या वेळी वाद उफाळून आला आणि पाटील यांनी जमावातील एका युवकाला, जो शिवप्रतिष्ठानचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते, मारहाण केल्याचा आरोप झाला. संबंधित तरुणास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यात निषेध व्यक्त करत युवकांनी आंदोलन छेडले. प्रकरणाची गंभीर दखल घेत ती माहिती थेट शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी तसेच मुख्यमंत्री व पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. परिणामी, तात्काळ निर्णय घेऊन निरीक्षक कांतीलाल पाटील यांना निलंबित करण्यात आले. या घटनेची चौकशी पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्याकडे सोपवण्यात आली असून, पाटील यांच्या विरोधात दाखल झालेल्या अदखलपात्र गुन्ह्याचा तपास साखरी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे करत आहेत.